यवतमाळ - आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस, त्यात कपाशीवरील बोंडअळी आणि सोयाबीनवरील खोडकिडींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पीक पूर्ण वाया गेल्याने कर्ज व उसनवारी कशी परत करावी, या विवंचनेतून नेर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या -
लोहतवाडी येथील विनोद सुखदेव राठोड (40) या शेतकऱ्याने घरात विष घेऊन आत्महत्या केली. विनोदच्या आई लिलाबा यांच्या नावे तीन एकर शेती आहे. भारतीय स्टेट बँकेचे एक लाख सात हजाराचे कर्ज विनोदवर आहे. बोंडअळी व सोयाबीनने दगा दिल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत तो होता. अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असे कुटुंब आहे.
गळफास घेत आत्महत्या -
पिप्री कलगाव येथे राजू गुलाबराव तुपटकर (56) शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. राजूकडे चार एकर शेती आहे. सततच्या नापिकीने तो त्रस्त होता. युनियन बँकेचे साडेतीन लाख व सावकाराचे 60 हजारांचे कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत होती़. त्याच्या मागे 4 मुली, एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.
हेही वाचा - शिवसेना नेत्याने कराची बेकरीचे नाव बदलले, संजय राऊत म्हणाले हे निरर्थक