यवतमाळ - विदर्भातील पर्यटकांनी आज १८ हजार ३६५ फुटावर असलेल्या खर्दुंग्ला पासवर तिरंगा फडकवत अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्य दिवस साजरा केला. यावेळी त्यांनी सरकारने कलम ३७० व ३५ A हटवल्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
अकोल्याचे माधव देशमुख हे आपल्या बालपणीच्या मित्रांसमवेत काश्मीरला गेले आहेत. आज स्वातंत्र्यदिवसाचे औचित्य साधत आणि काश्मीर मधील कलम ३७० व ३५ A हटविल्यानंतर पेंगॉग लेकवर त्यांच्या साथीदारांनी लडाख येथील मूलनिवासी असलेल्या नागरिकांसमवेत नृत्याचा आनंद घेत स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
आजचा दिवस माझ्या जीवनातील अतिशय गौरवपूर्ण दिवस असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली. काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर खरोखरच हा स्वातंत्र्यदिवस माझ्यासाठी आणि माझ्या बालमित्रांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय सुखद क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.