यवतमाळ - पांढरकवडा तालुक्याच्या अंधारवाडी आणि लगतच्या गावात वाघाची दहशत पसरली आहे. वाघ शेत शिवारात दिसल्याने गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील गावकऱ्यांच्या तीन बकऱ्या ठार केल्या आहेत.
वाघ या भागात बराच वेळ होता. टिपेश्वर अभयारण्याजवळ हे गाव असल्याने या अभयारण्यातून वाघ या भागात आला असल्याचे बोलले जाते आहे. पांढरकवडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या पाटणबोरी सर्कलमधील बोरी बीटमध्ये असलेल्या अंधारवाडी या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर सुरू आहे. रविवारी (दि. 3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास या भागात शेतात काम करणाऱ्या मजुरांना या वाघाचे दर्शन झाले असून शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सुमारास याच भागातील भीमराव आत्राम यांच्या 3 बकऱ्यांंची शिकार केली होती.
सध्या ग्रामीण भागात पिके मोठी झाल्याने डवरणी, निंदण अशी कामे शेतात सुरू आहे. मात्र, अशातच लगतच असलेक्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा मुक्त संचार सुरू आहे. अंधारवाडी या गावालगत टिपेश्वर अभ्यारण्य लागून आहे. याबाबतची माहिती मिळताच पांढरकवडा, झरीजामनी वनविभागाचे अधिकारी व वनविभागाचे पथक या वाघावर लक्ष ठेऊन आहेत.