यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील सीमेवरील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिक करत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काही उपाय योजण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.
उमरखेड तालुक्यात चातारी गावाजवळ पैनगंगा नदी वाहते. या नदीच्या पलीकडे नांदेड जिल्हा तर अलीकडे यवतमाळ जिल्हा आहे. ही पैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि लगतच्या ३-४ गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना अशा तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी मात्र, याकडे कुणीच लक्ष दिले नाही असे गावकरी म्हणतात.
हेही वाचा - जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान
चातारीला येण्यासाठी दुसरीकडुन किलोमीटर अंतरावरून आणि शेतातून वाट काढत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून येतात मात्र, त्यांचा प्रवास अडचणीचा असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु असून रोज 35 ते 40 विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - शासकीय वसतीगृहामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर; वडिलांचा शिक्षणाचा आर्थिक भार झाला कमी