यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील सावरगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आहे. शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कित्यकेदा निवेदन देऊनही अद्याप शिक्षक मिळाले नाहीत. सव्वाशे विद्यार्थी आणि दोनच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले.
सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर सुंदर असून, लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्यात आली आहे. वेगवेगळ्या उपक्रमाने सावरगाव येथील शाळेच्या पटसंख्येचा आलेख वाढत असून, इंग्रजी माध्यमातील विध्यार्थी सावरगाव येथील शाळेत दाखल होत आहेत. यावर्षी सव्वाशे विद्यार्थी आणि ७ वर्गशिक्षक आहे. मात्र, दोनच शिक्षक कार्यरत असल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मागील सत्रात केवळ एकच शिक्षक कार्यरत होते. पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे ३ शिक्षकांची तात्पुरती व एका कायम शिक्षकाची व्यवस्था केल्यानंतर व लवकरच स्थायी शिक्षक देण्याच्या आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आले. परंतु, यावर्षी तात्पुरते नेमलेले शिक्षक परत आपल्या शाळेवर गेले आहेत. त्यामुळे शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा गंभीर विषय असल्याने शाळा समितीने कित्येकदा प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांना ठराव देऊन निवेदन दिले आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कालिदास आरगुलवार, उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह समस्थ गावकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत, रास्ता रोको आंदोलन हटवणार नाही, अशी टोकाची भूमिका शाळा समिती व पालकांनी घेतली आहे.