यवतमाळ- जिल्ह्यात आर्णी तालुका परिसरात मानसूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधव सुखावला आहे. या पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र सोमवारी रात्री ६ वाजता दरम्यान अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला आणि धुवांधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रानात असलेल्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती.
आर्णी तालुका परिसरात मान्सूनपूर्व पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने परिसर झोडपून काढला. गेल्या महिन्याभरात कडक उन्हाळ्यानंतर पडलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक गावात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. या पावसामुळे वातावरणात दमटपणा तसेच उकाडा निर्माण झाला होता. जोरदार पाऊस पडल्याने तालुक्यातील अनेक शेतशिवारात पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधव शेतात सकाळीच मजुरासह दाखल झाले होते. मात्र शेतात पेरणी आटोपून घराकडे येण्याच्या तयारीत असताना सहा वाजता दरम्यान अचानक वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला आणि धुवांधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रानात असलेल्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच धावपळ उडाली होती.