यवतमाळ-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 30 लाखांचा दारुसाठा जप्त केला आहे. भरारी पथकाने डोर्ली डोळंबा येथे छापा टाकण्यात आला. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रक, पीकअप, कार जप्त करण्यात आली आहे.
मोर गोडावून ईस्टेट, डोर्ली डोळंबा (ता. यवतमाळ) येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकला असता एका ट्रकमधून हरियाणा राज्यातील विदेशी मद्य दुसऱ्या वाहनामध्ये ठेवत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून विनोदकुमार राजपुत (इटावा, उत्तरप्रदेश), दिनेश येंडाळे (वर्धा), निकेत पडडाखे (वर्धा), नितीन कळंबकर (वर्धा), सतिष येंडाळे (अकोला) व अमोल कांबळे (चंदननगर, नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल
विविध ब्रँडसचा एकूण 29 लाख 95 हजार 600 रुपयाचा मद्यसाठा, तसेच अशोक लेलॅण्ड कंपनीचा 17 लाख किंमतीचा दहा चाकी ट्रक, टाटा कंपनीचा 3 लाख पन्नास हजार किंमतीचे झेनॉन पीकअप चार चाकी वाहन व हुंडाई असेंट कंपनीची दीड लाख किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.के.तायकर, निरीक्षक ए.वाय. खांदवे, दुय्यम निरीक्षक एस.एम.मेश्राम, सहायक दुय्यम निरीक्षक आर.एम.राठोड, कॉन्स्टेबल एम.पी.शेंडे, एम.जी.रामटेके, बी.सी.मेश्राम कारवाईत सहभागी झाले होते, असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांनी सांगितले.