यवतमाळ : शिवरायांचा आशिर्वाद असल्याचे सांगत सत्तेवर आलेल्या भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी भाजपवर केला. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत “जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” या खासदार उदयनराजे भोसले यांनी उच्चारलेल्या नाऱ्याला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आज शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.

तहसिल कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बॅनरवरील व्यंकय्या नायडुंच्या प्रतिमेवर शाई फेकून निषेध नोंदवण्यात आला. माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं.
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे, असे वक्तव्य केले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत महाराष्ट्रभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वणी शिवसेनेतर्फे देखील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. व्यंकय्या नायडूंनी राजीनामा द्यावा व भाजपने याबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. आंदोलनात माजी आमदार विश्वास नांदेकर, गणपत लेडांगे, विक्रांत चचडा, बंटी येरणे, विक्की चवणे, विमल टोंगे, अभय सोमलवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.