यवतमाळ - कळंब येथील शिवाजी चौकाजवळील रासा रोडवरील एका कडूलिंबाच्या वाळलेल्या झाडाच्या पोकळीत साप शिरला म्हणून चक्क झाड पेटवल्याचा अजब प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडला आहे. मध्यवस्तीत हे झाड असल्याने या आगीला विजविण्यासाठी यवतमाळ येथून अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले. सुदैवाने या आगीत कुठलीच जीवित वा वित्तहानी झाली नसून या आगीतून सापही बचावला आहे.
झाडाच्या पोकळीत टाकली पेटलेली चिंधी
कळंब येथे एक बिनविषारी साप कडू लिंबाच्या पोकळीत शिरला. एका नागरिकाने ही घटना बघितली. त्याने या सापाला बाहेर काढण्यासाठी चिंधीला आग लावून झाडाच्या पोकळीत टाकली. बघता बघता झाडाने पेट घेतला. हे झाड नागरी वस्तीत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. महत् प्रयासाने ही आग विझविण्यात आली. पण सुदैवाने या सापाला कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. फायरब्रिगेडच्या लोकांनी या सापाला वाचविले. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय यावेळी आला.