यवतमाळ - नेर येथील बस वाहकाने तिकिटाच्या पैशातून उरलेला १ रुपया कमी दिल्याने एका प्रवाशाने थेट न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. राम माधवराव हळदे (६०) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांनी वर्षभर लढा देऊन एसटी महामंडळाकडून १ रुपया वसूल केला. शिवाय मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी आणि तक्रारखर्चासाठी एसटीकडून २ हजार रुपयेही त्याला मिळाले.
एसटी बसमधून प्रवास करताना अनेक वेळा सुटे पैसे बसवाहक देत नाही. प्रवाशीही आपलीच चूक समजून गप्प बसतात, पण नेर येथील हळदे याला अपवाद ठरले आणि त्यांनी बसवाहकाने बुडवलेला १ रुपया वसूल केला. ते नांदगाववरून नेरला जाण्यासाठी पुसद आगाराच्या बसमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांनी तिकीटाचे २४ रुपये सुटे नसल्याने बस वाहकास १०० रुपये दिले. त्यानंतर सुटे ५ रुपये दिले. वाहकाने हळदे यांच्या तिकीटामागे ८१ च्या ऐवजी ८० रुपये बाकी असल्याचे लिहून दिले. नेरला उतरताच हळदे यांनी ८१ रुपये मागताच बस चालकाने चिल्लर नाही, असे उर्मटपणे सांगत त्यांना उरलेले पैसे दिले नाही. त्यामुळे हळदे यांनी यवतमाळ येथील राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांना नोरीस पाठवून ८१ रुपयांची मागणी केली. पण त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी यवतमाळ ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर वाहकाने ८० रुपयाचा धनादेश त्यांच्या घरी तक्रार दाखल केल्यानंतर ६ महिन्यांनी पाठवला. मात्र, हळदे यांची मागणी ८१ रुपयाची होती. अर्जदाराची ८१ रुपयाची रक्कम ६ महिने वापरली आणि परत करताना १ रुपया कमी देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून हळदे यांना १ रुपया परत करावा, असा निर्णय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच यवतमाळ यांनी दिला. त्यानंतर एसटी महामंडळाकडून त्यांना १ रुपयासह मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी आणि तक्रारखर्चासाठी २ हजार रुपयेही मिळाले.