यवतमाळ - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे. बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत, त्यामुळे नागरिक बँकेत येत आहेत. असे असले तरिही गर्दी न करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या गेटवरच हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एकावेळी केवळ 3 ते 4 ग्राहकांनाच बँकेत आत सोडण्यात येत आहे. बाकीच्या ग्राहकांना बँकेच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांप्रमाणे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा... दिवे लावताना आगी लावल्या नाही म्हणजे मिळवले!
'सध्या बहुतांश व्यक्तींकडे एटीएम कार्ड आहे. ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. तरी नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने बँकेत यावे लागते. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सर्वच बँकांत ग्राहकांची गर्दी होत आहे. सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी बँकेत जात आहे. ग्राहकांनी अत्यावश्यक असेल तरच बँकेत यावे, तसेच बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहेत. त्या ठिकाणावरून देखील कामकाज करावे' असे आवाहन बँकेचे जिल्हा प्रबंधक पुरुषोत्तम बहिरशेट यांनी केले आहे.
एसबीआयच्या या शाखेत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना सॅनिटायझर दिले जात असून सुरक्षित अंतर देखील ठेवले जात आहे.