यवतमाळ - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वातही ‘पालका’विनाच प्रशासन बाजू सांभाळून होते. अखेर जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले आहे. राज्याचे रोजगार, स्वयंरोजगार व फलोत्पादनमंत्री शिवसेना आमदार संदीपान भुमरे पाटील यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे 60 दिवसानंतर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत.
दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दीड वर्षांतील सर्वाधिक रुग्ण आज समोर आले आहेत. एका दिवसात 1 हजार 267 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तब्बल 26 मृत्यू झाले आहे. अशी स्थिती असतानाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. त्यामुळे अनेक बाबीवर त्यांचा परिणाम दिसून आला. पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी होत होती. मात्र, अतंर्गत राजकारणात कुणाकडे पदभार द्यावा, अशी चर्चाही समोर आली होती. दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे, तसेच राज्याचे रोजगार, स्वंयरोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे पाटील यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.