यवतमाळ - जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत 15 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बी-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्रे यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर; गेल्या २४ तासांत ५२९ पॉझिटिव्ह, ९९३ कोरोनामुक्त
कृषी निविष्ठा होम डिलीव्हरीचा प्रयत्न करावा
या कालावधीत दुकानातील विक्री सोबतच शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप, मोबाईल कॉलद्वारे माहिती देऊन कृषी निविष्ठा होम डिलीव्हरी (घरपोच विक्री) करण्याच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी कार्यवाही करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या सोयीनुसार विक्री व गर्दी टाळण्यास मदत होईल. सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर कोविड त्रिसुत्रींचे पालन होण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी (राज्य तसेच जि.प.) यांनी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवेंची दुकाने 11 पर्यंतच
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनाधारकांनी दुकानात नागरिकांची गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलीवरीद्वारे वस्तुंचा पुरवठा करावा. यासाठी आस्थापनाधारकांनी स्वत:चा व्हॉट्सॲप क्रमांक दुकानासमोर प्रसिद्ध करावा, तसेच ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तूंचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होईल.
हेही वाचा - यवतमाळ : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल