यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यावेळी एका विष बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. विष बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राठोड यांना फोन लावला. उपचारात व्यग्र असलेल्या डॉक्टरांना ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र, ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो किंवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये,’ असे उत्तर डॉ. अच्युत नरोटे यांनी दिले.
हेही वाचा - 'काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक सारखे प्रश्न सुटले नसते
रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील हे संभाषण फोनवर असलेल्या संजय रोठोड यांनी ऐकले. यानंतर डॉ. अच्युत नरोटे यांना दुसऱ्या दिवशी आठ दिवस निलंबन करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. कुठलाही दोष नसताना केवळ मंत्र्याचा फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का? असा प्रश्न त्यांनी आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणि या पुढे अशा घटना टाळण्यासाठी डॉ. नरोटेंवर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.