यवतमाळ - शहरातील एका भूखंडाचे बनावट कागदपत्रे तयार करून तो भूखंड हस्तांतरित केल्याप्रकरणी न्यायालयाने पालकमंत्री येरावार यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून गुरुवारी 16 मे रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह सहा जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हेंसह 12 जणांनी मिळून तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या मदतीने जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून पालकमंत्री मदन येरावार, अमित चोखानी यांना मालमत्ता हस्तांतरित केली होती. त्यामुळे आयुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी बनावट कागदपत्रे करून भूखंड हस्तांतरण केल्याबाबत निकाल देत 420, 426,465,468 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
यात यवतमाळमधील प्रतिष्ठित भाजप जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री संजय देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, पालकमंत्री मदन येरावार, अमित चोखाणी, तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आदींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार काल रात्री उशिरा अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये पालक मंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
9241 चौरस फूट जागेचे प्रकरण -
यवतमाळ शहराच्या अवधूतवाडी (कोल्हेची चाळ) येथील एकूण 9 हजार 241 चौरस फूट जागेचे हे प्रकरण आहे. आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 11 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 9241 चौरस फुटापैकी 2309 चौरस फूट जागा किरण देशमुख यांनी खरेदी केली होती. परंतु त्यानंतरही कोल्हे कुटुंबीयांनी नियमानुसार 7887 चौरस फुटांऐवजी (देशमुख यांची जमीन कमी न करता) थेट 9241 चौरस फूट जागेची खरेदी मदन येरावार व अमित चोखाणी यांना 2013 ते 2016 दरम्यान करून दिली. या प्रकरणात किरण देशमुख यांची मालकी लपविण्यासाठी शासकीय कागदपत्रांमध्ये खोडतोडही केली गेली. खरेदीपूर्वी मदन येरावार यांना या जागेत किरण देशमुख यांची मालकी असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यवधींचा व्यवहार केला.