यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवले जात आहे. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातही एक कोविड कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातील कोविड रुग्णांच्या जेवणात गोम अळी निघाल्याने खळबळ उडाली आहे.
रुग्णांनी निकृष्ट दर्जाचा आहार व जेवणात निघालेल्या गोम अळीचा फोटो आणि व्हिडिओ काढून अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रा. प्रवीण प्रजापती यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला. प्रजापती यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि महाविद्यालय अधिष्ठाता यांच्याकडे या धक्कादायक प्रकाराची तक्रार केली. यापूर्वीदेखील जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. त्यावेळी रोष व्यक्त करण्यात आल्याने काही दिवस जेवणाचा दर्जा सुधारला होता. मात्र, आता पुन्हा रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात आहे.
वास्तविक पाहता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोरोना बाधितांना पोषक व पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. मात्र, निकृष्ट जेवण देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. या संदर्भात दखल न घेतल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे, प्रवीण प्रजापती यांनी सांगितले.