यवतमाळ - पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील सेवादास कृषी केंद्रात कृषी विभागाच्या धाडीत दोन लाख 58 हजारांचा अवैध खत साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी कृषी केंद्र चालक राजेश विश्वंभर चव्हाण यांच्यावर पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत ग्रुप अहमदाबादचे किसान गोल्ड (20-20-00) या कंपनीच्या खताला परवानगी नसताना, या खताच्या दोनशे बॅग विनापरवाना आढळून आल्या. या जप्त केलेल्या अवैध खत साठ्याची किंमत दोन लाख 58 हजार आहे. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, कृषी अधिकरी पंकज यांच्यासह तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड व त्यांच्या पथकाने केली आहे. या खताबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, कृषी केंद्र संचालक राजेश चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असून, पुढील तपास पुसद पोलीस करत आहेत.