यवतमाळ - कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहे. या संकट काळात भूक, तहान कशाचीही तमा न बाळगताना हे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असतात त्यांच्यामध्ये केवळ एकच ध्यास दिसून येतो, कोरोनाला पराभूत करण्याचं. यातच सेवनिवृत्तीच्या अखेरच्या क्षणापर्यंत पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावले आहे.
तसेही पोलीस खाते अतिशय शिस्तीचे आहे. सण, उत्सव, सभा, निवडणूक कोणताही कार्यक्रम असला की, पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या सुट्ट्यांवर पाणी फेरावे लागते. घरात कुणी आजारी असल्यास रुग्णालयात नेऊ शकत नाही. कुटुंबात सण-उत्सव साजरा करू शकत नाही. मात्र, समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा उपेक्षित आहे. चार दोन लोकांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. यातून एक तणाव निर्माण होतो. हे कुणीही नाकारू शकत नाही. तरीदेखील पोलीस आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्हा लॉकडाउन करण्यात आला. एकही नागरिक रस्त्यावर येऊ नये, त्यांनी आपल्या घरात सुरक्षित रहावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आपला देश या संकटातून बाहेर निघावा, यासाठी धडपड सुरू आहे. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे आपल्या घरी स्वस्थ बसू शकले नाही. मंगळवारी ३५ वर्षांच्या सेवेतील अखेरचा दिवस असताना सायंकाळी ठीक सहा वाजेपर्यंत कर्तव्य बजावले. आपण आता निवृत्त झालो, आज त्याचे वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, ठाणेदार सचिन लुले, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड आणि अशोक कांबळेच्या सहकाऱ्यांनी आज ज्या ठिकाणी कांबळे कर्तव्य बजावत होते तिथे जाऊन त्यांना जड अंतकरणाने निरोप घेतला.
या पोलीस कर्मचाऱ्याला ई टीव्ही भारतचा सलाम...