यवतमाळ - बोगस बियाणे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महागाव तालुक्यातील कासोळा येथे शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या मार्गावर दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या करीत आहेत. जीवन कसे जगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पूर्णत: नष्ट झाले. सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब फुटली तर कापसाला या पावसाचा जबर फटका बसला. त्यामुळे यावर्षी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. सोयाबीन, तूर, कापूस या पिकांना सरसकट पीक विमा लागू करण्यात यावा. शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे न करता थेट नुकसान भरपाई देण्यात यावी, कापूस व सोयाबीन या पिकांसाठी 16 तालुक्यात खरेदी केंद्र चालू करण्यात यावी, रब्बी हंगामाकरिता गहू आणि हरभरा 90 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन शासनाला सादर करण्यात आले.
आंदोलनस्थळी महागावचे तहसीलदार नामदेव इसाळकर व पुसद ग्रामीणचे ठाणेदार चोबे यांनी भेट दिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या आंदोलनाच्या जागी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तहसीलदार इसाळकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून या आंदोलनाचा समारोप केला. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनाला महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.