यवतमाळ - निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार पक्षाकडून उमेदवारी लढण्या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, कुठल्याही राजकीय नेत्यांची निष्ठा ही पक्षावर नाहीतर लोकांवर असली पाहिजे. लोक माझे मतदार हेच देव ठरले पाहिजे. म्हणूनच आम्ही कुठल्याही पक्षाच्या पाठिंबा न घेता ही लढाई एकाकी लढत आहे. महाराष्ट्रात जवळपास 40 मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवार उभे करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे या महिलेला लोकसभेची उमेदवारी दिली तर आता सामान्य घरातील बिपिन चौधरी ज्याला प्रहारचा कार्यकर्ता म्हणून विधानसभेच्या रिंगणात उभे केले आहे. भाजपवाले सुरुवातीला असे म्हणायचे लोकसभा द्या, नंतर विधानसभा, नगरपालिका आणि ग्रामपंचायत द्या, येथे सत्ता द्या विकास करू अशी बतावणी करत होतो. आता तुमचे घरे द्या अशी मानसिकता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झाली आहे. त्यांचाच सैनिक पालकमंत्री मदन येरावार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असून बेरोजगारी वाढली आहे. अशा अनेक गंभीर प्रश्नाकडे पालक मंत्री मदन येरावार दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदारांचे घर भरण्याचे काम हे भाजप सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बिपिन चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.