यवतमाळ - सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करुन नोकरीसाठी परीक्षेला समोरे जातात. मात्र, महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन काही मोजक्याच विद्यार्थ्यांना नोकरीवर लावले जात आहे. त्यामुळे या महापरीक्षा पोर्टलची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर, विद्यार्थ्यांवर शासनाने महापरीक्षा पोर्टल लादलेले आहे. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नसून, जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना डावलून इतरांचीच निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षांमध्ये उमेदवाराकडे आधार कार्ड असतानासुद्धा परीक्षेला बसू देण्यात आले नाही. तर, वन विभागाच्या भरतीमध्ये उणे पद्धत असताना सुद्धा एका विद्यार्थ्याला 120 पैकी 118.5 गुण मिळाले आहे. अशा सर्व संशयास्पद बाबी या पोर्टलच्या भरतीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या सर्व परीक्षांची तपासणी एसआयटीमार्फत व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महापरीक्षा पोर्टलवर ऑनलाईन परीक्षा विरोधात विद्यार्थ्यांना व युवकांना न्याय मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सोमवार 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजता यवतमाळ येथील शिवाजी ग्राऊंडवरुन भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मागण्यांमध्ये कुठल्याही रिक्त जागेची भरती ही जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात यावी. महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाइन परीक्षा बंद करण्यात यावी. एक परीक्षा एक पेपर घेण्यात यावा, शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढून शिक्षकांची भरती करण्यात यावी. एमपीएससी प्रमाणे लेखी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात यावी. स्पर्धा परीक्षांची फी ही 100 रुपये ठेवण्यात यावी, अशा विविध मागणीसाठी या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख बिपिन चौधरी, पिंटू दांडगे यांनी केले आहे.