यवतमाळ - मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णाने बुधवारी पहाटेच्या सुमारास पळ काढला. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. तसेच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला शोधण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एक ४० वर्षीय पुरुष २५ जुलैला पॉझिटिव्ह आढळला होता. ही व्यक्ती राजुर येथील रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली होती. तो तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्याने त्याच्यासह संपर्कातील इतर ३६ व्यक्तींनाही क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लघुशंकेला गेला आणि तेथूनच पसार झाला. तो पळून गेल्याचे वृत्त कळताच तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन जागे झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि रुग्णाची शोधाशोध सुरू केली. अद्याप पॉझिटीव्ह रुग्णाचा शोध लागलेला नाही.
मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेमधील कोव्हिड केअर सेंटरला अनेक रस्ते आहेत. हॉलच्या बाजूलाच खुली जागा असल्याने या रुग्णांना पळण्यासाठी अनेक वाटा आहेत. अशातच येथे कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी, होमगार्ड यांची येथे ड्युटी होती, तर मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची ड्युटी होती. तरीही रुग्णाने पळ काढल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.