यवतमाळ - जिल्ह्यातील एका खेड्या गावातील मुलगी फक्त वसतीगृहामुळे विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊ शकत आहे. त्या विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला दहावीनंतर शिक्षण घेता येत नव्हते. मात्र, वसतीगृहाच्या सोयीमुळे ते शक्य झाले आहे.
प्रतिक्षा संतोष कांबळे (वय 17), असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती बाभुळगाव तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आहे. ती दहावीमध्ये ८८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. त्यानंतर शहरात शिक्षण घेण्याचे तिचे ध्येय होते. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे शहरात शिक्षणाचा खर्च झेपावणार नाही याची तिला कल्पना होती. तसेच बसने येणे-जाणे करणेही शक्य नव्हते. कधी बसेस वेळेवर येत नाही. त्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होणार होता. शिवाय अभ्यासातही व्यत्यय येणार होता. त्यामुळे मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाबाबत प्रतिक्षाचे वडील संतोष कांबळे यांनी माहिती घेतली. दहावीत गुणवत्ता यादीप्रमाणे मुलींना वसतीगृहात प्रवेश दिला जातो, असे माहित झाल्यावर संतोष कांबळे यांनी अर्ज दाखल केला. त्यानुसार प्रतिक्षाचा प्रवेश निश्चित झाला. सध्या ती शहरातील समर्थवाडी येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात वास्तव्यास आहे. तसेच १२ वी विज्ञान शाखेमधून शिक्षण घेत आहे.
आता भावाच्या शिक्षणाचीही खर्च येणार -
शिक्षणासाठी शहरात राहणे आणि खाण्याची सोय झाल्यामुळे पालकांची काळजी मिटली आहे. घरातून 12 वी सायन्समध्ये शिक्षण घेणारी ती पहिलीच मुलगी आहे. वडील शेतीसोबतच रोजंदारीवर टाईल्स होल्डींगची कामे करतात. आजोबांच्या नावावर ३ एकर शेती आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. छोटा भाऊ यावर्षी दहावीला आहे. त्याचाही शिक्षणाचा समोर वाढता खर्च राहील. येथील वसतीगृहाच्या जवळच महाविद्यालय असल्यामुळे जाण्या-येण्यासाठी कमी वेळ लागतो. त्यामुळे वसतीगृहात अभ्यासाला खूप वेळ मिळतो. सद्यास्थितीत बारावीचा पाच तास अभ्यास सुरू असून चांगल्या गुणांनी 12 वी उत्तीर्ण होण्याचे ध्येय ठेवले आहे. विशेष म्हणजे नीटचीसुध्दा तयारी सुरू असून वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे प्रतिक्षाचा कल आहे. परिस्थितीपाहून नर्सिंगचा कोर्स करण्याचीसुध्दा तिने मनाची तयारी केली असल्याचे प्रतिक्षाने सांगितले.
शिक्षण करून लवकर जॉब मिळाला तर भावाच्या शिक्षणाच्या खर्चात घरच्यांना हातभार लागेल, असेही ती सांगते. वसतीगृहाच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारच्या आहे. सर्व मुली सायंकाळी सातच्या आत वसतीगृहात असल्या पाहिजे, असा नियम आहे. मुलींच्या दृष्टीने अतिशय चांगले वसतीगृह असून शहरात शिक्षण घेण्याची संधी शासकीय वसतीगृहामुळे मिळाली. आता या संधीचे सोने करून भविष्यात चांगले करीअर करायचे आहे, असेही प्रतिक्षाने सांगितले.
शहरातील समर्थवाडी येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात १०० मुलींची राहण्याची सोय आहे. सद्यस्थितीत ४३ मुलींचे प्रवेश झाले असून गतवर्षीच्या ७ मुली अशा एकूण ५० मुली येथे राहतात. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ३ मुली, नर्सिंगच्या ५ तर काही एमएसडब्ल्यू महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आठवीपासून तर पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुली या वसतीगृहात राहतात. यातील बहुतांश मुली या गावखेड्यातून आल्या असून मुलींची कोणतीही तक्रार या वसतीगृहाबद्दल नाही, अशा तेथील गृहपाल भगत सांगतात.
समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे. शिक्षणात त्यांचा सहभाग वाढावा यासाठी शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘माझी कन्या भाग्यश्री’ यासारख्या योजनांना प्रोत्साहन देत आहे. परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. मुलींनाही शहरात राहून उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाची योजना राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या अंतर्गत मागासवर्गीय मुलांचे तसेच मागासवर्गीय मुलींचे प्रत्येकी ९ शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. या वसतीगृहांमुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होत आहे. शहरात शिक्षण घेण्यासाठी वसतीगृह योजनेंतर्गत राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्यामुळे पालकांचीसुध्दा चिंता मिटल्याचे विद्यार्थीनीचे म्हणणे आहे.