यवतमाळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सायफळ (ता. घाटंजी) येथे वनविभाग तपासणी नाक्यावर नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करीत असताना ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
सारकणीकडून येणारे बोलेरो पिकअप (क्र. एमएच २६ एडी ५१५४) सायफळ येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर थांबविण्यात आले होते. यावेळी वाहनात एका पिशवीमध्ये नगदी रोकड आढळून आली. याबाबत चालक प्रवीण मेश्राम (रा. दवाखाना उमरी, ता. केळापूर) याला विचारणा केली असता, ही रक्कम मालक विक्की उर्फ मनोज सिंघानिया यांची असून सारकणी येथील बनाणी सेठ यांच्याकडे लोखंडाच्या व्यवहारासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, याबाबत चालकाने कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही.
वाहनातून हस्तगत केलेल्या रकमेमध्ये २ हजार रुपयांच्या १०७ नोटा (२ लाख १४ हजार रुपये), ५०० रुपयांच्या १६० नोटा (८० हजार रुपये), २०० रुपयांच्या ४५५ नोटा (९१ हजार रुपये), १०० रुपयांच्या २१०० नोटा (२ लाख १० हजार रुपये), ५० रुपयांच्या १०० नोटा (५ हजार रुपये), असे एकूण ६ लाख रुपये जप्त करण्यात आले.
रकमेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याने ती जप्त करण्यात आली आहे. ही बाब निवडणूक आयोग, आयकर विभाग, जिल्हा निवडणूक समिती यांच्याकडून खात्री करून, यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम घाटंजी येथील उप-कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस हेडकाँस्टेबल सुनील कुडमेथे, शिपाई सागर केराम आणि एसएसटी टीममधील महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक बेलसरे व तलाठी लढे, सुखदेवे, मंडळ अधिकारी नाईक आदींनी केली.
याशिवाय स्थिर सर्वेक्षण पथकाने केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी तपासणी नाक्यावर १२ लाख २ हजार ५२० रुपयांचे साहित्य (इनोव्हा कार व बिअरचे बॉक्स) जप्त केले आहेत.