यवतमाळ : जिल्ह्यातील पोलिस भरतीच्या 302 जागांसाठी 26 हजार 385 अर्ज दाखल झाले आहेत. (Yavatmal Police Recruitment). प्रत्यक्षात मैदानी चाचणीला सोमवार 2 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिस दलाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 200 अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त भरती प्रक्रियेसाठी असणार आहे. (Police Recruitment in Yavatmal District).
बऱ्याच वर्षांनंतर मेगाभरती : जिल्ह्यात चालक पदासाठी 125 महिलांनी अर्ज केले असून 244 पोलिस शिपाई जागेसाठी 22 हजार 305 तर चालकाच्या 58 जागांसाठी 4 हजार 80 अर्ज दाखल झाले आहे. एका जागेसाठी 88 उमेदवार स्पर्धेत आहे. गेल्या चार ते पाच वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी सरावांनी मैदाने गजबजली आहे. यवतमाळ जिल्हा पोलिसांकडून मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस कवायत मैदानवर (हेलीपॅड) होणार्या चाचणीसाठी पहाटे पाच वाजता उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. एका दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.
मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीची नजर : 2 आणि 3 जानेवारीला पोलिस चालक पदाच्या 58 जागेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पोलिस शिपाई पदाच्या 244 जागेसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. मैदानी चाचणीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
असा राहणार बंदोबस्त : संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक अधीक्षक पियुष जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार, महिला अंमलदार असा 200 हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
असे आहे नियोजन : हेलीपॅड मैदानावर पोलिस कवायत मैदान तयारी करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी, छाती, उंचीची मोजणी, गोळा फेक व 100 मीटर धावणे हे येथील मैदानात होणार आहे. यात मुलींसाठी 800 मीटर व मुलांसाठी 1600 मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस त्यांच्या भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचण्यांमध्ये प्रथमच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग वापरत आहे. जेणेकरून उमेदवारांनी अनिवार्य 800 आणि 1600 मीटर धावणे पूर्ण करण्यासाठी घेतलेला वेळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केला जाईल.