यवतमाळ : माजी वनमंत्री संजय राठोडांवर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदविला. भरोसा सेल, महिला बालकल्याण कक्ष व अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या समक्ष इन-कॅमेरा बंदद्वार खोलीमध्ये हा जबाब नोंदविण्यात आला. तब्बल अडीच तास या महिलेचा नोंदविण्यात आला.
घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्पीड पोस्टने एक तक्रार पाठवली होती. यात या महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. यानंतर जबाब नोंद देण्यासाठी ही महिला शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाली. विशेष तपास पथकाने तब्बल अडीच तास या महिलेची जबाब नोंदवून घेतला.
विशेष तपास पथकाकडून चौकशी
पीडित महिलेच्या पत्राची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी तपासासाठी कमिटी स्थापित केली होती. शुक्रवारी हे पथक तीन ठिकाणी जाऊन आल्यापावली माघारी परतले होते. त्यानंतर शनिवारी हे विशेष पथक घाटंजी तालुक्यातील तिच्या मूळगावी व पोलीस ठाण्यात सकाळीच दाखल झाले होते. यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. दरम्यान, या महिलेच्या जबाबानुसार आता जिल्हा पोलीस अधीक्षक पुढील कारवाई करणार आहेत.
हेही वाचा - संजय राठोड अडचणीत! जबाबासाठी पीडित महिला घाटंजी पोलीस ठाण्यात