यवतमाळ - कोरोना संसर्गामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस दलातील जवान रस्त्यावर बंदोबस्तासाठी जीवाचे रान करत आहेत. त्यातही नागरिकांचा कोरोनापासून बचाव करताना त्यांना त्यांचाही बचाव करायचा आहे. त्यामुळेच काही जवान आयडियाची भन्नाट कल्पना अमलात आणून कोरोनापासून संरक्षण करत आहेत. दारव्हा येथील पोलिसांनी तर चक्क भंगार साहित्यातून सॅनिटाईझर रुम तयार केली आहे. त्यामुळे कर्तव्यावरील पोलिसांना कोरोनापासून बचावाचा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या भन्नाट कल्पनेची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.
पोलिसांनी केलेल्या या सॅनिटायझर रुममध्ये होर्डिंगला लागणारी लोखंडी फ्रेम पडून होती. मंगलकार्यालात पूर्वी जे सुगंधी द्रव शिंपडण्यासाठी यंत्र लावले जात होते, ते यंत्रही भंगारात पडले होते. त्याला दुरुस्ती करून काही इतर साहित्य घेऊन ही रूम तयार करण्यात आली आहे. संचारबंदी काळात पोलीस प्राशासन महत्वाची भूमिका बजावत आहे. अशा वेळेस कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने पोलीस ठाण्याच हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
अशापद्धतीचा उपयोग तालुकास्तरावर केल्यास याचा लाभ अनेकांना होऊ शकतो. टाकाऊ वस्तूपासून ही रुम तयार केली आहे. अत्यंत कमी खर्चात भंगाराच्या वस्तूंपासून ही सॅनिटायझर रुम तयार केली आहे. दारव्हा पोलीस ठाण्याचे सर्व फिल्डवर असणारे जवान दिवसातून तीन वेळा सॅनेटायज होत आहेत. जिल्ह्याच्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भंगार साहित्यातून सॅनिटायझर रुम तयार केल्याने या अनोख्या उपक्रमाची दारव्हा शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.