यवतमाळ- आठ महिन्यांपासून सर्व कोरोनाविरुध्द लढाई लढत आहे. प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरीता पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलीस हे ‘फ्रंटलाईन वॉरिअर्स’ आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले. पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरीता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
पोलीस विभागाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती करण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षकांनी पार पाडली. ‘कोरोनाविरुध्द युध्द आमचे सुरू’ या संकल्पनेतून हे 30 खाटांचे रुग्णालय पोलिसांकरिता तसेच त्यांच्या कुटुंबियांकरीता उभारण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच अधिकारी व 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपस्थित होते.