यवतमाळ - शहरातील पाळसवाडी पोलीस वसाहत परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. संजय रतीराम साबळे (28), असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. यवतमाळ शहर रेडझोनमध्ये असल्याने पोलिसांवर मोठी जबाबदारी आलेली आहे. अशातच पळसवाडी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या संजय साबळे यांनी आपल्या घरातच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहराचे ठाणेदार धनंजय सायरे, आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. साबळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. सध्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दिवसांपासून आपले कर्तव्य बजावत होते.
संजय साबळे यांची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली असून ते सध्या एकटेच या वसाहतीत राहत होते. त्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी व्हाट्सअॅपवर स्टेटस ठेऊन विवंचनेत असल्याचे सांगितले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, नेमके आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.