यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा विदर्भ आणि मराठवाडाच्या सीमेवरील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यंदा काँग्रेसचे विजय खडसे विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार डॉ. विश्वनाथ विणकरे यांच्यात थेट लढत होणार आहे.
हेही वाचा - मातोश्रीच्या अंगणात प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेची डोकेदुखी !
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या फळीच्या बळावर त्यांनी रणशिंग फुंकले आहे. मागील 15 वर्षपासून डॉ. विश्वनाथ विणकरे यांनी मतदारसंघात चांगली पक्ष बांधणी केली असून दांडगा जनसंपर्क आहे. विद्यमान आमदार राजू नजरधने यांची उमेदवारी डावलल्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते हे सेनेच्या बंडखोर उमेदवार विणकरे यांच्या बाजूने आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे यांनी मागील 5 वर्षात मतदारसंघ पिंजून काढला आहे. 2009 मध्ये विजय खडसे विजयी झाले होते. तेव्हापासून खडसे मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यांनी मतदारसंघात वेगळी फळी निर्माण केली. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नामदेव ससाणे उभे असून या मतदारसंघात कोण बाजी मारतो याची सर्वांना उत्कंठा आहे.