यवतमाळ - मुंबई येथील लोकल रेल्वे प्रवासाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून रेल्वे प्रवास सुरू करण्यास सहमती दर्शवली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करता येणार आहे. मात्र, पहिला डोस घेतलेल्या अनेकांना दुसरा डोस मिळाला नाही. त्यांच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत लवकरच नवीन निकष ठरविण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीच्या फोर्म्युलानुसारच काम -
महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची धुसफूस नसून, फोर्म्युलानुसारच राज्यात काम सुरू आहेत. असेच काम यवतमाळ जिल्ह्यातही सुरू राहणार आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच धुसफूस होती. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये असे काही नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्येवर शासन गंभीर
शेतकरी हा आपल्या कुटुंबाचा आधार असतो. त्याने जर आत्महत्या केली तर पूर्ण कुटुंबाची वाताहत होते. शासन म्हणून यावर मदत तर मिळतेच. शेतकरी आत्महत्यानंतर कुटुंबाला एक लाखाची मदत दिली जाते. मात्र, आज कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही वाढ करण्याची वेळ नसून, यात वाढ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि निश्चितच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला वाढीव मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचेही यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यात फिजीशीयनचा तुटवडा
राज्यात कोरोनाचे सावट असून व्हेंटिलेशन व इतर रुग्णालयातील यंत्रांचा वापर करणारे फिजिशियन यांचा तुटवडा आहे. शासनाने जीआर काढून 75 हजार रुपये महिना हा फार कमी आहे. पुढच्या वेळेस जाहिरात काढताना दीड लाख रुपये ठरवावा. नैसर्गिक आपत्ती विभागाकडून अतिरिक्त रक्कम देणार असल्याचेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा - जनतेच्या सेवेसाठी राजकारणात येता, पण स्वार्थासाठी माकडउड्या घेता; कर्माचा हिशोब द्यावा लागेल- फादर गुदीन्हो