यवतमाळ - जांब येथे झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक खाली घुसली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी मार्गावर रास्तारोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.
रामदास राघोजी गेडाम (रा. जांब)असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गेडाम हे आपल्या (एमएच 29 एल 3447) क्रमांकाच्या दुचाकीवरून बायपासने जात होते. त्याच रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव कारने गेडाम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी बाजूला उभ्या असलेल्या ट्रक खाली घुसली. त्यामुळे रामदास गेडाम यांचा चिरडून मृत्यू झाला.
हेही वाचा - शेजाऱ्याने पळवली शेजारीण; समजूत काढताना पोलिसांसह दोघांचेही कुटुंबीय झाले हैराण
या घटनेची माहिती मिळताच जांब येथील संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर अन्य वाहनांसोबत जड वाहनांचीही वर्दळ आहे, त्यामुळे या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून जांब गावाजवळ उड्डानपुल बनवण्यात यावा, अशी मागणी गावकऱयांनी केली आहे.
यवतमाळ ग्रामीण व अवधूतवाडी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.