यवतमाळ - लंपी स्कीन ( Lumpy skin ) डिसीज या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रारंभी एका जनावराला अशा स्वरूपाचा आजार आढळला आठ दिवसात हा आकडा 157 च्या वर पोहोचलाय ज्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढला अशा ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे दरम्यान या ठिकाणी लसीकरण केले जात आहे.
पशुधनाला सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न - जिल्ह्यातील संपूर्ण पशुधनाच्या संरक्षणासाठी अडीच लाख लस जिल्ह्यात पोहोचली आहे. तर आणखीन दीड लाख लस दाखल होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव झरी घाटंजी यवतमाळ पुसद महागाव उमरखेड दारवा मालेगाव तालुक्यातील अशा एकूण 47 गावांमध्ये जनावरे बाधित झाली आहे. यातील 81 जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले यांनी दिली आहे. पशु गणनेनुसार 19 लाख पशुची नोंद आहे. यापैकी सहा लाख पशु गाय वर्गामध्ये मोडणारे आहे. गाय वर्गीय पशु मध्येच लंबी स्क्रीन डिसीज दिसून आले आहे. या पशुधनाला सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी नियमित कर्मचाऱ्यासह काही खाजगी कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे.
लसीकरणाची मोहीम - जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम राबवली आहे. जिल्ह्यात प्रत्येक गाय वर्गीय पशूला ही लस दिली जाणार आहे. तसेच लसीकरण मोहीम राबविताना शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुट्ट्या देखील आपत्ती काळात रद्द करण्यात आले आहेत. यामुळे कर्मचारी पूर्ण वेळ लसीकरणासाठी देणार आहे. बाधित जनावरांचे दूध आपण पिल्यास आपणाला कुठलीही बाधा होणार नाही अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली.