यवतमाळ - जिल्ह्यात सुरुवातीला फक्त शहरी विभागातच कोरोनाचा प्रभाव होता. पण गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे. यात दिग्रस, दारव्हा, नेर, वणी या तालुक्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील तरुण कोरोनाने गंभीर आजारी पडला. पण योग्यवेळी त्याच्यावर उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले. शुक्रवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी शेजाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत त्याचे स्वागत केले.
सुरुवातीला दिग्रस येथे विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. यानंतर तो पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. त्याच्यावर 14 दिवस उपचार करण्यात आल्यानंतर तो निगेटिव्ह आला. शुक्रवारी रात्री उशिरा अखेर तो कोरोनावर मात करून घरी परतला. यावेळी शेजाऱ्यांकडून त्याचे पुष्पवृष्टी करत आणि रांगोळी काढत जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्या कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. त्याला आता 14 दिवस गृह विलीगीकरणात ठेवण्यात येणार आहे.