यवतमाळ - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नाईक घराणे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस काळात विद्यमान आमदार मनोहर नाईक हे अन्न व औषध प्रशासन मंत्री राहिले आहेत. त्यांचा मुलगा इंद्रनील नाईक आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे जिल्ह्यासह पुसदच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा गड असलेला आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या नाईक परिवारात शिवसेनेच्या प्रवेशाने खिंडार पडणार आहे. इंद्रनील नाईक हे सध्या मुंबई येथे सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
विदर्भात मनोहर नाईक हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाकडून आॅफर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुसद येथे येत्या दोन दिवसात बैठक होणार असून त्यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असल्याने इंद्रनील नाईक शिवसेना प्रवेश करणार असल्याची चर्चा सद्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते प्रवेश करणार ही चर्चा आहे की, अफवा हे येत्या काळात स्पष्ट होईल.