यवतमाळ - जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नगर विकास वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा विकास निधीमधून पाच कोटी रुपये खर्चून एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेची निर्मिती केली. या अभ्यासिकेचे उद्घाटन 2019 मध्ये तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. आज याला दोन वर्षे पूर्ण होऊनही अभ्यासिका विध्यार्थ्यांसाठी यांच्यासाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसच्यावतीने अभ्यासिका खुली करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसात अभ्यासिका खुली करण्यात आली नाही तर आम्ही स्वतः त्याचे पुन्हा उद्घाटन करून विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यवतमाळ असल्याने शहरात ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. खासगी अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना बाराशे ते पंधराशे रुपये मोजावे लागतात. शिवाय ग्रंथालयासाठी वेगळे पैसेही विद्यार्थ्यांना द्यावे लागते, त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. मात्र, डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम अभ्यासिकेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटरनेट, संगणक, वायफाय अशा सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोयीचे जाणार आहे. या ठिकाणी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात बसू शकतात. त्यामुळे ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. येत्या दहा दिवसात अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली नाही, तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे ती खुली करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.