यवतमाळ - गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. विदर्भातही पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्या मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधु नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या पुराच्या पाण्यामुळे विदर्भ मराठवाडाला जोडणाऱ्या उमरखेड मधील मार्लेगाव पुलावर पाणी पोहोचले आहे. पुराची ही परिस्थती लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. पुरस्थितीमुळे नागपूर बोरी-तूळजापूर हा महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहने थांबविण्यात आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी पुसद उमरखेड या भागांमध्ये संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या भागातील प्रकल्प, धरणे शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. अशातच या पाण्यामुळे छोट्या-मोठ्या नदी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहणे सुरू झाले आहे. त्यातच मंगळवारी अशाच एका पूल आलेल्या नाल्याच्या पूलावर एसटी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात चौघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असल्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढून ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वहात आहे. त्या ठिकाणीच वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी नदी नाल्यावर जाऊ नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - यवतमाळच्या उमरखेड येथे एसटी बस गेली वाहून; पाहा VIDEO