यवतमाळ - कोरोनामुळे गेल्या दीडवर्षांपासून अधिक काळ बससेवा बंद होती. कोरोनाच्या संकटावर मात करीत एसटी रुळावर येत असतानाच आता तिकीट मशीन (ईटीआयएम) बिघडल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल 400 मशीन बंद असून वणी, राळेगाव, दारव्हा, पुसद, उमरखेड आगारात पुन्हा जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात आहे. परिणामी एसटीत पुन्हा टिकटिक ऐकायला येत आहे.
वाहकांची डोकेदुखी वाढली -
एसटीतील प्रवाशांना ईटीआयएमद्वारे मिळणारे तिकीट बंद होत आहे. जुन्यापद्धतीचे तिकीट आणि त्याला छिद्र करण्यासाठी होणारी टिकटिक पुन्हा सुरू झाली आहे. ईटीआयएम उपलब्ध करून देणार्या कंपनीचा करार संपुष्टात येत आहे. शिवाय, दुरुस्तीसाठी महामंडळांकडे रक्कम नसल्याचे सांगितल्या जात आहे. यवतमाळमधील सर्वच आगारात बससेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिर्घकाळापासून बंद होत्या. तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणार्या ईटीआय मशीनचा या काळात वापर झाला नाही. आता त्या मशीन बंद पडणे, तर कधी विशिष्ट बटन ऑपरेट न होणे, बॅटरी उतरणे अशा विविध कारणामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. मशीनची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अशी वेळ आल्याची ओरड वाहकांकडून सुरु आहे.
जेष्ठ नागरिकांना ठरणार अडचणीचे -
यवतमाळ विभागात एक हजार 54 ईटीआय मशीन आहे. त्यातील 439 मशीन सध्यास्थितीत सुरु असून 407 मशीन बिघडलेल्या आहेत. सध्या अनेक फेर्यामध्ये ‘स्ट्रे’सुरु झाले आहे. ईटीआय मशिन असल्याने एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह सवलती मिळणार्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यात स्मार्ट कार्ड धारकांची संख्या मोठी आहे. कागद तसेच वेळीच बचत असा दुहेरी उद्देश महामंडळांचा होता. आता ईटीआय मशीन बंद होत असल्याने हे कार्ड रिड करणारे दुसरी कोणतीही यंत्रणा महामंडळाकडे नाही.
नव्या वाहकाला 'स्ट्रे'चे प्रशिक्षणच नाही -
तिकीट मशीन बंद पडल्याने अनेक अडचणी येत आहे. मशीन लवकर सुरू होत नाही. आपोआपच बंद होत असल्याने गोंधळही निर्माण होतो. कोरोनाकाळात नवीन समस्या निर्माण झाली आहे. चार वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मशीन बंद होत आहे. प्रिंटरमधून तिकीट निघत नाही. दुसऱ्या मार्गावर गेल्यास अडचणी येतात. यवतमाळ इतर जिल्ह्यात गेल्यास तिकीट किती हे माहिती नसते. अनेक अडचणी येतात. या दरम्यान नव्याने रुजू झालेल्यांना स्ट्रेचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला नवीन मशीन पुरविण्यात याव्यात, अशी मागणी वाहकांकडून होत आहे.
हेही वाचा - नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा, म्हणाले बाळासाहेबांचे आशीर्वाद डोक्यावर आहेत