यवतमाळ - हिऱ्यांचा व्यवसाय म्हटले की, गुजरातमधील सुरत हे शहर डोळ्यासमोर येते. मात्र, यवतमाळसारख्या आदिवासी जिल्ह्यातील नेरसारख्या ग्रामीण भागात हा व्यवसाय सुरू आहे. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कोरोनाच्या काळात अनेकांच्या हाताला रोजगार देत ही किमया साधली आहे, नेरच्या किशोर खांनजोडे या युवकाने. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय पूर्णपणे बंद पडले. बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला. या परिस्थितीत अनेकजण हतबल झाले. मात्र याच काळात किशोर याने अनेक युवकांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध करुन दिली.
असा सुरु झाला प्रवास
नेर तालुक्यातील सावंगा या छोट्याशा गावात किशोरचा जन्म झाला. घरी असलेल्या चार एकर कोरडवाहू जमिनीत उपजीविका होत नव्हती. रोजगाराच्या शोधात मोठा भाऊ सुरत येथे गेला. किशोरचे शिक्षण कसेबसे सुरू होते. कधी शेतात तर कधी दुसऱ्याच्या मजुरीला जाऊन आपल्या कुटुंबाचे पोट भरावे लागत होते. अशातच किशोर हे दहावी नापास झाले. आता पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर 1993 ला किशोर सुरतला गेला. तिथे त्याने तीन वर्षे हिऱ्यांवर पैलू पाडण्याचे काम केले. नंतर सहा वर्षे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले. तर पंधरा वर्षे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम सांभाळले. यानंतरही किशोर स्वस्थ बसला नाही. त्यांनी सुरत येथे आपला स्वतःचा हिऱ्याला पैलू पाडण्याचा कारखाना सुरू केला. कारखाना सुरू होऊन बारा महिने लोटले. सर्व काही सुरळीत सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि सर्व उद्योग बंद झाले आणि किशोरलाही गावाकडे यावे लागले.
हेही वाचा-सिंधुदुर्गच्या सीमांवर आरोग्य विभागाची पथके तैनात, चाकरमान्यांची तपासणी