यवतमाळ- पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दारू विक्रेत्याने चक्क पांढरकवडा मार्गावरील स्मशानाच्या भिंतीला लागूनच दारूची भट्टी लावली होती. मात्र, अवधूतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून थेट घटनास्थळ गाठून दारू गाळणाऱ्याला रंगेहात पकडले. त्याचबरोबर, घटनास्थळावरून मोठा दारूसाठा देखील जप्त केला.
देविदास अराडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांसह कुणाचेही लक्ष हिंदू स्मशानाकडे जाणार नाही. तसेच, स्मशानभूमीला लागून एक नालासुद्धा आहे. त्यामुळे, नागरिकांचे लक्ष त्याकडे जाणार नाही. म्हणून, दारू विक्रेत्याने पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीच्या भिंतीला लागून दारू हातभट्टीचा अवैध धंदा सुरू केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून ४०० लिटर हातभट्टी दारू आणि ३०० लिटर मोहमा सडावा जप्त केला असून एकून २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या हातभट्टीची नासधूस करून दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले आहे.
हेही वाचा- शासनाच्या कर्जमाफीवर यवतमाळातील शेतकरी नाराज; सरसकट कर्जमाफीची होती अपेक्षा