यवतमाळ - विधानपरिषद निवडणूक जोर धरू लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 90 मतदारांना आलिशान खासगी ट्रॅव्हल्सने हैदराबादमार्गे कन्याकुमारी येथे सहलीला रवाना करण्यात आले आहे. यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून सुमित बाजोरिया हे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार तगडे असून या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत एकूण 489 मतदार असून त्यात महाविकास आघाडीकडे 250 पेक्षा अधिक मतदार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपकडे 190 मतदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मतदार फुटण्याच्या भीतीने बाभूळगाव, राळेगाव, आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पुसद, या तालुक्यातील अनेक नगरसेवक मतदारांना महाविकास आघाडीकडून हैदराबाद येथे विशेष बसने रवाना करण्यात आले आहे. हे नगरसेवक 30 जानेवारीपर्यंत सहलीवर आहेत. 31 जानेवारीला नागपूर येथून मतदारांना एकत्रित करून मतदानासाठी पाठवले जाणार आहे.
महाविकास आघाडीला मतदार फुटण्याची मोठी भीती असल्याने हा उपाय केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार असल्याचे बोलले जात आहे.