यवतमाळ - हो हे खरे आहे! यवतमाळच्या नेताजी नगर परीसरातील येंगड कुटुंबातील सदस्य असलेल्या 'लक्ष्मी'चा डोहाळे कार्यक्रम साजरा करण्यात आला. सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा शहरात होत आहे.
देविदास येंगड हे रोजमजुरीचे काम करतात. त्यांच्या घरी 1 वर्षपूर्वी लक्ष्मीचे आगमन झाले आणि पाहता-पाहता लक्ष्मी संपूर्ण कुटुंबाची लाडकी झाली. तिचा कुटूंबियांना लळा लागला आणि ती घरातील एक सदस्य झाली. त्याच गाईचा सांभाळ करणारे सदाशिव येंगड यांना २ मुले आहेत. मात्र, मुलीची उणीव त्यांना लक्ष्मी आल्यापासून कधी जाणवली नाही. लक्ष्मी गाय त्यांच्यासाठी मुलगी आणि बहीण दोन्ही झाल्याने त्या प्रेमातून त्यागाईचा डोहाळे कार्यक्रम येंगड कुटूंबाने ठेवला. त्यासाठी लक्ष्मीचा गोठा पाना फुलांनी सजविला. दारासमोर रांगोळी आणि दारात मंडपसुद्धा टाकला. परिसरातील नागरिकांना सुध्दा खास आमंत्रण देऊन बोलविण्यात आले. आज लक्ष्मीच्या आगमननंतर या कुटुंबाचे आयुष्य बदलले आणि दिवसागणिक प्रगती होत आहे.
हेही वाचा - संजय राठोड यांच्या अंगात संंचारले उदयनराजे
लक्ष्मीच्या आगमनानंतर आता येंगड कुटूंबियांनी १-२ म्हशी आणि आणि १ छोटं कालवडसुद्धा घेतले आहे आणि हा बदल खुप सुंदर आहे असे हे दाम्पत्य सांगतात. आता पुढे लक्ष्मी येत्या काही दिवसात वासराला जन्म देणार असून हा या कुटूंबासाठी आनंदी क्षण असणार आहे. त्यामुळे सर्वांना या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी येंगड कुटूंबियांनी लक्ष्मीचा हा डोहाळे कार्यक्रम ठेवला. यासाठी तिला आवडणारी पाच फळे आणि एक शालू सुद्धा दिला. ओवाळणी करून फुलांचा हार टाकून तिला तिच्या आवडीचा चारा, फळे दिली आणि उपस्थित लोकांना फराळसुद्धा देण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होणे हा आनंदाचा भाग असल्याचे नागरिक सांगत असून हा कार्यक्रम वेगळा असल्याने सर्वानी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावली होती.
हेही वाचा - यवतमाळमधील चुरशीच्या लढतीत मदन येरावार यांचा विजय