यवतमाळ - शनिवारीपासून नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळापूर येथील प्रसिध्द जगदंबा मंदिरातील दरवर्षी होणारा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना यावर्षी दर्शन घेता येणार नसल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे दिसत आहे. देवस्थानकडून स्थानिक दूरचित्र वाहिनीवरून दोन्ही वेळच्या पुजेचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने भाविकांनी घरूनच दर्शन करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे
पांढरकवडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील केळापूर येथिल जगदंबा मंदिर आहे. दरवर्षी येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात भाविकांची मांदियाळी असते. विदर्भासह, मराठवाडा, तेलांगणा, आंध्रप्रदेशवरून दररोज 40 हजारावर भाविक या नवरात्र उत्सवाला हजेरी लावतात. मात्र, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मंदीरे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा यात्रा यावर्षी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे यावर्षी देवीच्या आराधनेत खंड पडणार आहे. तर देवस्थान प्रशासनाच्या वतीने स्थानिक दूरचित्र वाहिनीवरून दोन्ही वेळची पूजेच प्रक्षेपण दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी घरूनच दर्शन करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. तर, कोरोनाचे संकट बघता हा महोत्सव अत्यंत साधेपणे केल्या जाणार आहे. यादरम्यान जो धार्मिक विधी आहे तो देवस्थानकडून सामाजिक अंतर ठेवून पार पाडल्या जाणार आहे. मात्र, भाविकांना मंदिर गाभाऱ्यात प्रवेश दिल्या जाणार नसल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली. त्यामुळे भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त वामन शेडमाके यांनी केली आहे.