यवतमाळ - शेतकऱ्यांची जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथील अवैध सावकारावर धाड टाकून महत्वाची कागदपत्रके जप्त करण्यात आली. ही कारवाई पुसद येथील सहकारी संस्था तथा सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने केली आहे.
अवैध सावकारीमध्ये जमीन हडपल्याबाबत संभाजी लिंबाजी मुरमुरे (रा. बिजोरा ता. महागाव) व उकंडा पुंजाजी पांडे (रा. राजुरा ता. महागाव) यांनी २३ एप्रिल २०१९ ला पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पुसद तालुक्यातील श्रीरामपूरचे अवैध सावकार सुरज माधवराव वैद्य व माधवराव रुखमाजी वैद्य यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती.
अवैध सावकार वैद्य यांना जमिनीचे दस्तावेज तसेच अवैधरित्या ताब्यात असलेली चल, अचल संपत्ती सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी याप्रकरणी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे याप्रकरणी सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. यात काही महत्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुसद येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी अनिल सुरपाम, महागाव येथील सहकार अधिकारी डी. यु. खुरसडे तसेच दिग्रस येथील सहकार अधिकारी एस.आर.अभ्यंकर यांनी केली. या कारवाईत पोलीस उपनिरिक्षक एस.सी.दोडके, पोलीस शिपाई के.एस.जायभाये, वर्षा पाईकराव यांचाही सहभाग होता.