यवतमाळ - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद’ यात्रा बुधवारी २८ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे. या यात्रे दरम्यान, नेर येथे शेतकऱ्यांची भेट, शहरामध्ये ‘आदित्य संवाद’ आणि दारव्हा येथे शिवसेना विजय संकल्प मेळावा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात आदित्य ठाकरे हे शेतकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
२८ ऑगस्टला, सकाळी ११ वाजता अमरावती मार्गे नेर येथे जनआशीर्वाद यात्रेचे आगमन होणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे परिसरातील शेतकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नेर येथून दुपारी १२.३० वाजता ही यात्रा यवतमाळ दाखल होणार आहे.
दरम्यान, पोस्टल मैदानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आयोजित ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राहणार आहे. यानंतर ही यात्रा दारव्हाकडे रवाना होणार आहे. दारव्हा येथील शिवाजी स्टेडियममध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेने तर्फे ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेनेने केली आहे.
यात्रेसोबत युवासेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी, शिवसेनेचे मंत्री आणि खासदार देखील राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर ही यात्रा वाशिम जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती, शिवसेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर, पराग पिंगळे आणि राजेंद्र गायकवाड यांनी दिली.