यवतमाळ - शेतकऱ्यांनी शेतात प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला फळ सुद्धा आले. मात्र, कडक निर्बंध आणि शेजारील राज्यातील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी नेण्यास तयार नाही. त्यामुळे, फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
हेही वाचा - यवतमाळ : ऑटो-ट्रकच्या अपघातात दोन ठार; सहा गंभीर जखमी
व्यापाऱ्यांचा फळ घेण्यास नकार
पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी फळ उत्पादन घेतात. येथील श्रीकृष्ण देशट्टीवार यांच्याकडे चार एकर केळी, पाच एकर टरबूज आणि तीन एकरावर लिंबू लागवड केली आहे. मात्र, आता व्यापारी शेतात तोडणीस आणि निर्यातीसाठी तयार असलेले फळ नेण्यास तयार नाही, त्यामुळे शेतकऱ्याचे चार लाखांवर नुकसान होत आहे.
पिके दिली पेटवून
राज्यातील कडक निर्बध आणि बाजूच्या राज्यातील लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे आता पीक कुणी घेण्यास तयार नसल्याने देशट्टीवार यांनी शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले आहे. व्यापारी केळी उचलत नाही, त्यामुळे केळी पिवळी पडली, तर कुठे गळून पडली आहे. त्यामुळे, त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांना पेटवून दिले आहे. हीच अवस्था तीन एकरावरील निंबुची झाली आहे. हजारो रुपये या शेतकऱ्याने शेतात खर्च केले. आता व्यापारी उत्पादित माल नेण्यास तयार नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांची अशीच स्थिती
याच भागातील महेंद्र नैताम यांनी सुद्धा तीन एकरवर टरबूजची लागवड केली, मात्र त्यांचा माल नेण्यास व्यापारी तयार नाही. श्रीनिवास शिवणवार यांच्याकडेसुद्धा चार एकरावर टरबूजची लागवड झाली, मात्र त्यालाही नेण्यास कुणी व्यापारी तयार नाही, त्यामुळे टरबूज शेतात सडून जात आहेत. याच भागातील साधारण 40 एकर क्षेत्रावर शेतकरऱ्यांनी टरबूज लागवड केली. त्या सर्वांची अशीच विदारक अवस्था आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कडक निर्बंध आणि शेजारील राज्यातील लॉकडाऊनचा फटका बसला आहे.
हेही वाचा - जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर; गेल्या २४ तासांत ५२९ पॉझिटिव्ह, ९९३ कोरोनामुक्त