यवतमाळ - आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीची मदत हवी असल्यास ती आता अवघ्या काही मिनिटांत पोलिसांकडून उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांना महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ११२ हा नंबर डायल करावा लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात पोलीस गस्तीसाठी ५४ जीप व ९५ दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून, पोलीस विभागाला त्याचे हस्तांतरण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
'नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध होणार'
पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशामक सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ठ क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला, तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार हा संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणाऱ्या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.
'जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजना'
जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५४ जीम व ९५ दुचाकीसाठी ६ कोटी ४४ लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सर्व पोलीस ठाणे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.