यवतमाळ - विनाअनुदानित शिक्षकांच्या मागील वीस वर्षांपासून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. यातीलच एक शिक्षक उपेंद्र पाटील यांनी मागण्या पूर्ण होण्यासाठी अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. तोही, अर्धनग्न अवस्थेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज यवतमाळ येथील मतदान केंद्रावर ते शर्ट न घालता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. तसेच निवडून आल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या, जुनी पेन्शन योजना, यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अपक्ष उपेंद्र पाटील उमेदवाराची मतदान केंद्रावर सर्वत्र चर्चा होती.
शासनाने कायम विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याचे पत्र काढले. याला पाच वर्षाचा कालावधी लोटला. प्रत्यक्षात मात्र 20 टक्केच अनुदान देण्यात आले. त्यामुळे 20 टक्के अनुदानात पूर्ण कपडे घालण्याच्या लायक शासनाने आम्हाला ठेवले नाही, असे ते म्हणाले. यामुळे 'जेवढे टक्के अनुदान; तेवढेच टक्के कपडे', हे माझे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडून आल्यानंतही शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत सभागृहात पूर्ण कपडे घालणार नसल्याचा निर्धार पाटील यांनी केला आहे.