यवतमाळ - गुटखा तस्करीचे केंद्र बनलेल्या यवतमाळच्या आर्णी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल २२ लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक असा एकूण ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आर्णीतील गुटखा तस्करांविरोधात केलेल्या या धडाकेबाज कारवाईने स्थानिक पोलीस, अन्न व औषधी प्रशासनाची यंत्रणा यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह तर लागलेच, शिवाय गुटखा तस्करांचे देखील धाबे दणाणले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे टाकली धाड
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आर्णी शहरातील डोंगा कॉलनी येथील सना एम्पोरियम व कुऱ्हा रोडवरील एका गोडाउनवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. या सोबतच कापेश्वर फाट्याजवळ गुटख्याने भरलेला टाटा 1109 ट्रक पकडला. यामध्ये एकुण 29 लाख 81 हजार 600 रुपयाचा गुटखा व 1109 ट्रक (एमएच 07 सी 5694) किंमत अंदाजे 8 लाख असे एकूण, 37 लाख 81 हजार 600 रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
चौघांना केली अटक
पोलिसांनी याप्रकरणी गाडी चालक आरिफ रऊफ़ बैलिम (29, रा.आर्णी), क्लिनर आतिश शालिकराम कोडापे (23), गुटख्याची साठेबाजी करणारे शेख महेबुब शेख सादिक (34) व शेख सलीम शेख गफुर (38, सर्व रा. शास्त्री नगर, आर्णी) यांना अटक केली आहे. जप्त केलेला संपुर्ण मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने अन्न व प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला आहे. वरील चारही आरोपी विरुद्ध विविध आर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थनिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कार्यवाही स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी, सहाय्यक पोलीस निरिक्षक विवेक देशमूख, सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश रंधे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, उमेश पिसाळकर, बबलु चव्हाण, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले, यशवंत जाधव, सुधीर पिदुरकर, प्रफुल दडवी यांनी केली.