यवतमाळ - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे.
तसेच कृषी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे कृषी निविष्ठा पुरवठाधारकांनी कंपन्यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
कृषी निविष्ठा खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी गटांमार्फत सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे, खते, किटकनाशके व शेतीकरीता लागणारे आवश्यक साहित्य पोहोचवावे. शेतकऱ्यांनीसुद्धा शेतकरी गटांमार्फत बांधावरच एकत्रितरित्या हे साहित्य खरेदी करावे. यासाठी शेतकऱ्यांना ज्या कृषी केंद्रातून साहित्य खरेदी करावयाचे आहे, त्या दुकानाच्या नावासह खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे वाणनिहाय बियाणे, खते यांची मागणी शेतकरी गटांकडे करावी. सोबतच शेतकऱ्यांनी स्वत: चे नाव, पत्ता, शेत सर्व्हे क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांकही द्यावे.
मागणी असलेल्या निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यावर गटप्रमुखाने खते, बियाणे खरेदी करावे, जेणेकरून त्यांना कृषी केंद्रावर जावे लागणार नाही. ज्या विक्रेत्यांना शक्य आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप तयार करून त्यावर मागणी नोंदऊन घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले.